कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम थंडावली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच लसीकरण बंद असल्याने नागरीकांचा हिरमोड झाला. त्यामुळे मंगळवारी लसीकरणासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. केडीएमसीच्या आचार्य अत्रे रंग मंदीर येथे लसीकरणासाठी लागलेली रांग चक्क शिवाजी चौकापर्यंत पोहचली आहे. लस घेण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत, पण लसींचा मुबलक साठाच नसल्याने लसीकरणासाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत प्रशासन असल्याचे दिसून येते.
आतापर्यंत शहरात 63 हजार 926 नागरीकांनी कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याची माहिती केडीएमसीच्या आरोग्य विभागातून प्राप्त झाली आहे. पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोससाठी आवश्यक असलेला कालावधी उलटून गेल्यानं बहुतांश नागरिक विवंचनेत होते. अखेर केडीएमसीच्या आठ लसीकरण केंद्रावर आज लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील आठवड्यात फक्त सोमवारी आणि शनिवारी लसीकरण झाले होते. लसींचा पुरवठा अपुरा पडत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
कल्याण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आचार्य अत्रे रंग मंदिर लसीकरण केंद्रावर मंगळवारी सकाळपासूनच नागरिकांनी रांग लावली आहे. मात्र, ही गर्दी पाहता तितक्या लस उपलब्ध आहेत की नाही? हा देखील एक प्रश्न आहे. दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी त्या त्या केंद्रावर उपलब्ध असलेल्या लसींची माहिती देऊन किती लोकांचे लसीकरण होईल याचा अंदाज मांडणं गरजेचे आहे. अन्यथा भूक तहान विसरून तासनतास रांगेत उभे राहून अनेकांच्या पदरी निराशा पडू शकते.