कल्याण- घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेला तीन महिने पूर्ण होण्याआधीच आता कल्याणमध्येही होर्डिंग कोसळल्याची घटना घटली आहे. कल्याण पश्चिम येथील सहजानंद चौकात भले मोठे होर्डिंग कोसळले आहे. या घटनेत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दोनजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
संजय राऊतांनी धनुष्यबाणाची आशा सोडली? म्हणाले ठाकरेंच्या शिवसेनेचे चिन्ह आता मशालच, याच चिन्हावर...
कल्याण मधील सहजानंद चौकात भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत होर्डिंग खाली उभे असलेल्या गाड्यांचं नुकसान झालं तर दोन जण किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
सहजानंद चौक हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे , २४ तास या रस्त्यावर वर्दळ असते याच रस्त्यावर सकाळी रहदारीच्या वेळेस हा होर्डिंग कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. होर्डिंग बाजूला करण्यास आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत होर्डिंग वर कारवाई कधी होणार असा सवाल केला. घाटकोपर मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर तरी महापालिका धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करेल का हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू
वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर ७८ जण जखमी झाले. मृतांची संख्या वाढली असून, हा आकडा आता १४ वर गेला होता.
होर्डिंग अगदी तकलादू पद्धतीने लावले गेल्याचे स्पष्ट झाल्याने बेपर्वाईचे मुंबईकर बळी ठरले आहेत. होर्डिंग आणि पंपाचे छत एकत्रितपणे पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली वाहने दाबली गेली. तर मुंबईत विविध ठिकाणी झाडे पडून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. रात्री नऊपर्यंत ७८ जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटना एवढी मोठी होती की, राष्ट्रीय आपत्ती दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली होती.