डोंबिवली - टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आयोजन मंडळाच्या अमृतोत्सवीवर्षात सलग १५ व्या वर्षी बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सलग १५ व्या वर्षीच्या बुद्धिबळ स्पर्धेस १८० स्पर्धकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गेली १४ वर्षे ठाणे डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन यांच्याशी संलग्नपणे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
मंडळाचे दिवंगत कार्यकर्ते आणि डोंबिवलीतील सुयोग मंगल कार्यालयाचे संचालक कै श्री दर्शन निमकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सालाबादप्रमाणे निमकर कुटुंबियांच्या सुयोग मंगल कार्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा हि स्पर्धा विविध वयोगटांतील स्पर्धकांच्या गटांमध्ये विभागणीकरून खेळविण्यात आली. यामध्ये ७ वर्षाखालील, ९ वर्षाखालील, ११ वर्षाखालील आणि १३ वर्षाखालील सुमारे ९४ स्पर्धक सकाळच्या सत्रात तर ८ वर्षाखालील, १० वर्षाखालील, १२ वर्षाखालील आणि १५ वर्षाखालील वयोगटांतील सुमारे ८८ स्पर्धक संध्याकाळच्या सत्रात असे एकूण १८२ स्पर्धक सहभागी झाले होते. प्रत्येक गटांतील सर्व स्पर्धकांना सर्व फेऱ्या खेळण्याची संधी देऊन सर्व फेऱ्यांमधील अव्वल १० मुलांना आणि अव्वल ५ मुलींना ट्रॅाफी देऊन गौरविण्यात आले.
गेली १४ वर्षे मंडळाच्या या स्पर्धेकरीता मार्गदर्शक म्हणून जोडले गेलेले श्रीहरी वैशंपायन , ठाणे डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे चिफ आर्बिट्रेटर डॅा तांडेल मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे, माजी अध्यक्ष नंदन दातार, स्पर्धा प्रमुख प्रथमेश जोशी आणि या स्पर्धेचे संपुर्ण व्यवस्थापन पाहणारे मोहित लढे आणि सहर्ष सोमण यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके स्पर्धेनंतर वितरीत करण्यात आली. निमकर कुटुंबियांनी सदर स्पर्धेकरीता केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल आणि आपले मंगल कार्यालय मंडळास उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे यांनी निमकर कुटुंबियांचे आभार मानले. तसेच अशाच प्रकारची रॅंकिंगची स्पर्धा देखील आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असल्याचे भावे यांनी सांगितले.