उल्हासनगर : शहरातील विविध भागात पाणीबानी निर्माण झाली असतांना महापालिकेच्या जलकुंभाला गळती लागून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आवाज उठवूनही महापालिकेने काहीएक कारवाई केली नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चंदनशिवे यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेने नागरिकांना समप्रमाणात पाणी पुरवठा होण्यासाठी उंच जलकुंभ व दोन ठिकाणी भूमिगत पाणी साठवण टाक्या बांधल्या आहेत. तसेच त्याच्या दिमतीला पंपिंग स्टेशन उभारले आहेत. असे असतांनाही शहरात असमान पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप होत आहे. उच्चभ्रू वस्तीत दिवसाला दोन वेळा तर झोपडपट्टी भागात दिवसाला अर्धा तास तर काही परिसरात दिवसाआड रात्री बेरात्री पाणी पुरवठा होतो. याबाबत झोपडपट्टीतील माजी नगरसेवकांनी आवाज उठवूनही पाणी पुरवठा समान झाला नसल्याचे चित्र आहे. एकीकडे विविध भागात पाणीटंचाई असतांना उंच व भूमिगत जलकुंभला गळती लागली आहे.
कॅम्प नं-५ येथील नेताजी चौक परिसरात ३ उंच तर एक भूमिगत जलकुंभ आहे. त्यापैकी भूमिगत जलकुंभा भोवती विविध झाडे उगविली असून अनेक ठिकाणी गळती लागून लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे. तसेच डम्पिंग ग्राऊंड येथील उंच जलकुंभालाही गळती लागली आहे. कॅम्प नं-४, येथील तक्षशिला शाळा शेजारी दोन उंच जलकुंभा पैकी एका जलकुंभाला गळती लागली आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाने एखादी दुर्घटना होण्यापूर्वी उंच व भूमिगत जलकुंभाचे सर्वेक्षण करून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. जलकुंभाच्या पाणी गळतीमुळे होणारी पाण्याची नासाडी प्रथम थांबविणे गरजेचे आहे. तसेच जलवाहिन्याला लागलेली गळतीवर उपाययोजना केल्यास लाखो लिटर पाण्याची बचत होणार आहे.