कल्याण - शिवसेना सोडणाऱ्यांनी अनेक कारणे दिली. त्यात हिंदूत्वासाठी सोडली. संजय राऊत यांच्यामुळे सोडली. राष्ट्रवादीकडून अन्याय सुरु होता म्हणून सोडली. ही सगळी कारणे दिली जात आहेत. ही कारणे काही वास्तवाला धरुन नाही. त्यांनी केवळ स्वार्थापोटीच शिवसेना सोडली असल्याचा टोला शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी शिंदे गटाला दिला आहे.
शिवसेनाचा कल्याण ग्रामीण रायते येथे कार्यकर्ता मेळावा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास शिवसेनेचे युवा सेना ठाणे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर, कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर, युवा सेनेचे सह सचिव जयेश वाणी, कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे, उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी, अलताफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना माजी आमदार म्हात्रे यांनी सांगितले की, ज्याना नेते पदाची आपेक्षा होती. त्यांनी शिवसेना सोडली. त्यामागे त्यांचा स्वार्थ होता. मात्र जे लोक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. तेच खरे शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक आहेत. निष्ठावान शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना जो प्रतिसाद मिळत आहे. ते पाहता राज्यातील शिवसैनिक आणि सामान्य नागरीक उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे.
काल ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार प्रसंगी, शिंदे यांनी मोदी शहा यांनी उद्धव ठाकरे यांना कोणताही शब्द दिला नव्हता असा गौप्यस्फोट केला आहे. याविषयी शिवसेना माजी आमदार म्हात्रे यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा स्पष्ट केले की, स्वर्गीय बाळासाहेब यांच्या खोलीत चर्चा झाली होती. त्या चर्चे संदर्भात आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते, समसमान वाटप होणार होते. आत्ता हा शब्द फिरवला जातो. त्यामुळे ते त्यांनाच विचारा.