डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर, वकिलांचा मुलगा वकील, अशी कितीतरी व्यावसायिक कुटुंबे आपल्या पहाण्यात असतात. पण एखादे संपूर्ण कुटूंबच तीन पिढया एका सेवेचा वारसा चालवत असतील तर..अशी उदाहरणे खूपच दुर्मिळ आहेत. मूळचे सोलापूरचे असणाऱ्या ओंबासे कुटुंबीय हे त्यापैकी एक. तीन पिढ्यांचा पोलिस दलातील सेवेचा वारसा असणाऱ्या ओंबासे कुटूंबियांची तिसरी पिढी आता आपल्या सेवेच्या कार्यकालामुळे पुन्हा एकदा आपल्या पितृक म्हणजेच सोलापूर जिल्ह्यात एकत्र आले आहेत. ओंबासे कुटुंबातील आताच्या पिढीतील संदीप, प्रविण आणि स्नुषा सोनाली सोलापूर शहरात आपापले कर्तव्य बजावत आहेत.
ओंबासे कुटुंबिय सोलापूर जिल्ह्यातील करमाळा जिंती येथील रहिवासी असले तरी करमाळा तालुक्यातील वंजारवाडी या गावात सर्वाचे बालपण गेले. ओंबासे कुटूंबातील शंकरराव ओंबासे हे पोलिस दलात सामील होणारी पहिली व्यक्ती. आपल्या वडील बंधूंच्या पावलावर पाऊल ठेवून यशवंतराव यांनीही प्रथम आर्मी व नंतर पोलिस दलात प्रवेश केला. यशवंतराव यांनी पंढरपूर येथून आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर, अकलूज , सोलापूर येथे सेवा बजावल्यावर पोलिस हवालदार म्हणून निवृत्त झाले. त्यांचे बंधू शंकरराव यांनी पुणे शहरात विविध ठिकाणी आपली सेवा देत उप निरीक्षक पदावरून निवृत्त झाले. आपले वडील यशवंतराव यांच्याप्रमाणे त्यांचे जेष्ठ चिरंजीव संजय आणि कनिष्ठ चिरंजीव संदीप यांनीही पोलीस सेवेला प्राधान्य दिले. संजय यांनी पोलिस दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. तर संदीप यांनी रेल्वे क्राईम अधिकारी कल्याण मुलुंड दादर पनवेल तूर्भे असे वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आता सोलापूर येथे रेल्वे गुप्तचर विभागात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
संजय ओंबासे यांचे चार वर्षांपूर्वी अपघाती निधन झाल्यावर त्यांचे चिरंजीव प्रवीण आणि पोलिस दलात सामील झाले. ओंबासे कुटूंबातील तिसऱ्या पातीने तर आणखी एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या पिढीपर्यंत ओंबासे कुटुंबातील स्त्रियांनी गृहकर्तव्याला महत्व दिले होते. पण निलेश यांची पत्नी सोनाली या पोलिस दलात असून सध्या त्या फौजदार चावडी येते पोलीस दलात सेवा देत आहेत. पोलिस विभाग किंवा खात्याशी असलेली ओंबासे कुटुंबियांची बांधिलकी इथेच संपत नाही. सेवेत असो किंवा नसोत ओंबासे कुटूंबियाने पोलिस दलासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. म्हणूनच, पोलिस दलात संधी मिळाली नाही तरी संजय ओंबासे यांचा छोटा मुलगा रोहित पोलिस बॉईज संघटनेच्या माध्यमातून पोलिस दलाशी जोडलेली आपली नाळ सांभाळून आहेत. सोलापूर पोलिस बॉईज संघटनेचे अध्यक्ष या नात्याने रोहित नेहमीच पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी विविध उपक्रम आणि योजना राबवत असतात. यासर्वातून ओंबासे कुटुंबातील लोकांचा पोलिस दलाप्रति असलेला जिव्हाळा आणि आपुलकी असणारी कौटुंबिक परंपरा महाराष्ट्रात पहायला मिळणे असे विरळच आहे असे म्हणावे लागेल.