कल्याण-कल्याण ग्रामीणमधील कल्याण मुरबाड रस्तयालगत असलेल्या वरप गावातील टाटा पावर हाऊसमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. बिबट्या टाटा पावर हाऊसमध्ये फिरताना सीसीटीव्ही कैद झाला आहे. या घटनेमुळे गाव परिसरात नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
हा प्रकार कळताच वन विभागाने वरपगावचा संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. हा परिसर जंगाल भागाला लागून असल्याने बिबट्या वाट चूकून या परिसरात आला असावा. बिबट्या सीसीटीव्हीत दिसून आल्याने नागरीकांनी सतर्क राहावे. रात्रीच्या वेळी घराबाहेर फिरु नये. फिरल्यास समूहाने राहावे असे आवाहन वन खात्यातर्फे नागरीकांना करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी कल्याण पूर्वेतील एका इमारती बिबट्या शिरला होता. त्याला वनखात्याने जेरबंद केले होते. त्यासाठी आठ तासाचे शर्तीचे प्रयत्न करावे लागले होते. त्यानंतर नेवाळी, मलंग गड भागात बिबट्या दिसून आला होता. तसेच अंबरनाथच्या तीन झाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगण्यात आले होते. कल्याण मलंग गड परिसर हा इकाे सेन्सीटीव्ह झोन आहे.
मलंग गड हा सह्याद्री पर्वत रांगाची फूटहिल्स समजली जाते. तिथून पुढे पेब चंदेरी, डबल डेकर, माथेरान, लोणावळा, भिमाशंकर, हरिश्चंद्र गड, मालशेज,काेकण कडा, आजा पर्वत, कळसूबाई शिखर अशी भली मोठी सह्याद्रीची रांग आहे. या भागातील दाट जंगलातून बिवट्या नागरी वस्तीत येत असावा असा अंदाज वन्य आणि पर्यावरण अभ्यासकाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बिबट्याच्या गळ्यात जिओ टॅगिंग असल्यास त्याचा वावर नक्की कुठे आहे हे समजू शकते. मात्र आढळून आलेल्या बिवट्यांच्या गळ्यात जिओ टॅगिंग नसल्याने त्याचा वावर नक्की कुठे आहे आणि तो कुठे गेला? असावा याचा अंदाज बांधणे वन खात्यास कठीण होऊन बसले आहे.