कल्याण : पती-पत्नीमध्ये सुरु असलेल्या भांडणात मध्यस्थी करूनही आपले ऐकत नसल्याच्या रागातून साडूची कोयत्याने हत्या करणाऱ्या सुनील सोनावणे (रा. उंबरमाळी, शहापूर) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी सोमवारी जन्मठेप सुनावली.शहापूर तालुक्यातील उंबरमाळी येथे राहणाऱ्या संदीप पुराणे (२७) याला दारूचे व्यसन होते.
या कारणावरून त्याचे पत्नी सुनितासोबत सतत भांडण होत होते. १ जुलै २०१६ च्या सायंकाळी संदीपचे सुनितासोबत पुन्हा भांडण सुरु झाले. हे भांडण आपापसात मिटविण्यासाठी संदीप याचा साडू सुनीलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, संदीपने त्याचे ऐकले नाही. याच गोष्टीचा राग मनात धरून सुनीलने संदीपला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, त्याच्या हातातील कोयत्याने संदीपवर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या संदीपचा मृत्यू झाला. त्यावेळी, संदीपला वाचविण्यासाठी गेलेल्या शंकर बेंडकुळे ला देखील जीवे ठार मारण्याचा सुनीलने प्रयत्न केला. याप्रकरणी कसारा पोलिसांनी सुनील विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आणि पोलीस उपनिरीक्षक के. जी. घोसाळकर यांनी सबळ पुरावे गोळा करून न्यायालयाला सादर केले होते. याप्रकरणात सरकारी वकील म्हणून सचिन कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे आणि पोलीस नाईक आर. एच. वाकडे यांनी मदत केली.