कल्याण : दुकान आपल्या नावावर करत नसल्याच्या रागातून भावाला हत्याराने भोसकून जीवे ठार मारणाऱ्या शंकर शांतप्पा कोळी (५४) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. कचरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दुकानाचे मालक असलेले ब्रम्हा शांतप्पा कोळी २६ जानेवारी २००७ च्या दुपारी नाश्ता करून दुकानाच्या दिशेने पायी जात होते. यावेळी, शंकर याच्यासह विष्णू कोळी आणि त्यांच्या मामाचा मुलगा राजू कोळी यांनी दुकान नावावर करण्याच्या कारणावरून ब्रम्हा यांच्यावर तलवारीसारख्या धारदार हत्याने भोसकून जीवे ठार मारले.
याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजू नाईक यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपी शंकर याच्यासह अन्य दोघांना अटक केली. त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केले. सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने दोघांची सुटका केली. या खटल्यात सरकारी वकील रचना भोईर यांनी काम पाहिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोलीस हवालदार भालचंद्र द. पवार यांनी मदत केली.