कल्याण: डोंबिवली महानगरपालिका हद्दीत नालेसफाई म्हटलं की काही ना काही वाद हा निर्माण होतो. सध्या केडीएमसीत प्रशासकीय राजवट असल्यानं महासभेत नालेसफ़ाईवरून रंगणारा नाट्यमय कलगीतुरा यंदा पहावयास मिळाला नाही.पावसाळयात शहरातील अनेक भागात पाणी साचते हा प्रकार तर दरवर्षीचा झालाय. सध्या शहरात ठिकठिकाणी नालेसफ़ाई सुरू असली तरी साफसफाई करणा-या कर्मचा-यां ना कोणत्याही प्रकारचे सुरक्षिततेचे साहित्य पुरविण्यात न आल्याच समोर येतंय. त्यामुळे हे कामगार अक्षरशः जीव धोक्यात घालून काम करत असल्याचं धक्कादायक चित्रं शहरात दिसून येत आबहे.
साफसफाई करणारे हे कामगार आपल्यापैकीच एक नागरिक आहेत. विठ्ठलवाडी परिसर, एमआयडीसी परिसरात व इतर ठिकाणी नालेसफ़ाईची कामं सुरुयेत. शहरात विहिरी आणि नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याच अनेकदा समोर आलंय. इतकेच नाही तर या सांडपाण्यामुळे अनेक दुर्घटना देखील घडल्यात. असे असतानाही साफसफाई करणारे कामगार हे मास्क न घालता, बूट न घालता, हँड ग्लोज न घालता नाल्यामध्ये उतरवून साफसफाई करताना दिसतायेत. या नाल्यात अक्षरशः हात घालून मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर टाकला जातोय. या कच-यांच्या ढिगात काचा व इतर टोकदार साहित्याचा देखील समावेश आहे.
कल्याण डोंबिवली शहरात एमआयडीसीचे चेंबर साफ करताना आणि कल्याण पूर्वेत विहिरीतील सांडपाण्यामुळे अनेकांना आपला जीव नाहक गमवावा लागलाय. त्यामुळे एमआयडीसी असो वा इतर परिसर नालेसफ़ाई करताना संबंधित कंत्राटदाराने कामगारांच्या सुरक्षिततेचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. यासाठी यंत्रणांनी देखील कंत्राटदाराला कडक शब्दात कारवाईचा इशारा देणे आवश्यक आहे अन्यथा एखादा अनुचित प्रकार झाल्यावर लोकप्रतिनिधींचे दौरे व यंत्रणांचे कागदी घोडे नाचविणे हे सर्व प्रकार सुरू होतात आणि यातून गुन्हे दाखल करण्यापलीकडे काहीच निष्पन्न होत नाही.