कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची ४४० एकर जागा गौतम अदानी यांनी लिलावात घेतली असून, या जागेवर लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार असल्याची माहिती अदानी कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आली. कामगार संघटनांचा थकीत देण्यांचा अडीच हजार रुपयांचा दावाही कंपनीने फेटाळून लावला असून, कामगारांच्या देण्यापोटी १०४ कोटी राष्ट्रीय लवादाकडे भरल्याचे सांगितले.
एनआरसी कंपनीच्या जुन्या व्यवस्थापनाने ४४० एकर जागेपैकी १०३ एकर जागा रहेजा बिल्डरला विकली होती. हा विक्री व्यवहार न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर कंपनी लिलावात विकण्यास काढली असता अदानी यांच्या कंपनीने ही जमीन विकत घेतली. जुन्या व्यवस्थापनासोबत रहेजांचा व्यवहार झाला हाेता. आता अदानी रहेजा यांच्यासोबत सेटलमेंट करून त्याची माहिती न्यायालयात देणार असे ठरले आहे. अदानीने कंपनीची जागा लिलावात घेतल्याने त्यांना जमिनीचा ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कंपनी कायद्यानुसार, राष्ट्रीय लवादाच्या आदेशानुसार कामगारांची देणी देण्यासाठी ३२ कोटी रुपये भरण्याची तयारी अदानी कंपनीने दाखविली आहे. मात्र, इतक्या रकमेत कामगारांची देणी भागणार नाहीत, असा मुद्दा उपस्थित झाल्याने अदानीने कामगारांच्या देण्यापोटी लवादाकडे १०४ कोटी रुपये भरले आहेत. ही रक्कम भरल्यापासून ४५ दिवसांत धनादेशाद्वारे कामगारांना वाटप करण्याचा आदेश दिलेला आहे.
सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत चार हजार कामगारांपैकी ६५० कामगारांनी धनादेश स्वीकारले आहेत. जवळपास १४ कोटी ५० लाख रुपये कामगारांना वितरित केले आहेत. ज्या वर्षी कंपनी बंद झाली, त्या वर्षाचा पगार थकबाकी म्हणून दिला जातो. कंपनी १० वर्षे बंद असल्याने बंद काळातील पगार थकबाकीच्या स्वरूपात दिला जाऊ शकत नाही. कारण त्या काळात उत्पादन बंद होते, असे अदानी कंपनीचे म्हणणे असून, त्यामुळे १०४ कोटींची रक्कम कामगारांची देणी देण्यासाठी पुरेशी आहे, असा अदानी कंपनीचा दावा आहे. कामगार संघटनांच्या दाव्यानुसार अडीच हजार कोटी रुपयांची थकीत देणी देण्याचा विचार व्यवहार्य नाही, असेही कंपनीचे म्हणणे आहे.