मुरलीधर भवार, कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आण खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका करीत असताना उद्धव सेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दीवार सिनेमाचा दाखला देत टिका केली आहे. या टिकेला कल्याणचे शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. खासदारकीसाठी प्रियंका चतुर्वेदी या कुठे कुठे फिरल्या. याचा विचार त्यांनी करावा. मगच मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर बाेलावे असा टोला आमदार भोईर यांनी खासदार चतुर्वेदी यांना लगावला आहे.
आमदार भोईर यांनी सांगितले की, चतुर्वेदी यांनी या आधी किती पक्षात उड्या मारल्या. जिथे भेटेल तिकडे जायचे असे त्यांचे धोरण आहे. त्यांनी इतरांबाबत बोलू नये . त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. काही काम सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे पिक्चरचे उदाहरण देत असतात. खासदार शिंदे यांचे कार्य बोलते. एकनाथ शिंदे यांचे श्रीकांत शिंदे सुपुत्र आहेत . हा काही त्यांचा गुन्हा नाही. त्यांच्या या वक्तव्यावरुन महिला खासदारची मानसिकता कळते.
या मुद्यावर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, चित्रपटाची राजकारणाशी जोड घालणे यावरुन त्यांची खासदार चतुर्वेदी यांची बुद्धीमत्ता किती खालच्या थराला गेली आहे हे दिसून येते. मुख्यमंत्री शिंदे यांना गद्दार बोलणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांच्यामुळेच संजय राऊत हे खासदार आहेत. त्यामुळे ज्या वेळेला अनेक प्रसंग आले. त्या वेळेला पक्षाची निष्ठा म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्तव्य बजावले आहे. टिका करणाऱ्या चतुर्वेदी या कुठे मूळ पक्षातल्या आहेत. त्या पक्ष सोडूनच आल्यात म्हणजे त्याही गद्दारच आहेत. स्वतः गद्दारी केलेल्यांनी दुसऱ्याकडे गद्दार म्हणून बोट दाखवू नये. आम्ही जिथे आहोत. तिथे निष्ठावंत आहोत. एवढं त्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा जिल्हा प्रमुख लांडगे यांनी चतुर्वेदी यांना दिला आहे.