डोंबिवली: सोमवारी संपन्न होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 24-कल्याण लोकसभा मतदार संघाची मतदान प्रक्रियेची यंत्रणा सज्ज असून, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करुन मतदाराचा आपला हक्क बजवावा, असे आवाहन 24-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले. 24-कल्याण लोकसभा मतदार संघातील एकूण 6 विधानसभा मतदार संघात 1960 मतदान केंद्रे असून 10 पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी तसेच जास्त घनता असलेल्या ठिकाणी म्हणजे एकूण 1012 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही व वेब कास्टींगची सुविधा पुरविण्यात आली आहे. सद्यास्थितीतील तीव्र उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर 1 मेडिकल कीट तसेच किमान आवश्यक सुविधांची (पिण्याचे पाणी, रॅम्प, शौचालय इ.) व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदानाचे ठिकाणी आरोग्य सेविका/आशा सेविकांची नेमणूक करण्यात येत आहे. मतदारांना मतदार यादीतील नोंदीबाबतच्या तपशिलाच्या मतदार स्लिप वाटण्याचे काम पूर्ण झाले आहे. निवडणूकीकामी 12 मे रोजी अधिकारी व कर्मचा-यांचे द्वितीय प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हिलचेअर ची व्यवस्था करण्यात आली असून, “सक्षम प्रणालीद्वारे” विनंती करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगाना रांगेत उभे न राहता मतदान करता येणार आहे. तसेच अंध दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्व मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र तळ मजल्यावर घेण्यात आले आहे. आता पर्यंत सी व्हीजिल ॲपवर 318 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, सदर तक्रारींचे निवारण या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदार संघांनी विहीत वेळेत केलेले आहे.
सद्यास्थितीपर्यंत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी संदर्भात 5 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 149 कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातील 216 मतदान केंद्रात पर्दानशीन महिला मतदार असल्यामुळे या प्रत्येक केंद्रात महिला मतदार कर्मचा-याची नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण लेाकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 1 दिव्यांग मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र 1 पिंकबुथ म्हणजे महिला मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र आणि युवा मतदार कर्मचारी उपलब्ध झाल्यास प्रत्येक मतदार संघनिहाय 1 युवा मतदार कर्मचारी केंद्र मतदानासाठी उपलब्ध राहणार आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही सुरेंद्र बाजपेयी बंदीस्त सभागृह, वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्राँगरुमची व्यवस्था सावित्रीबाई फुले कला मंदिरातील तळघरात करण्यात आली असून, तेथे राज्य पोलीस, राज्य राखीव दल व केंद्रीय पोलीस सुरक्षा दल अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.