डोंबिवली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक, डोंबिवली जिमखानाचे संस्थापक, लायन्स क्लब, स्वरतीर्थ कै. सुधीर फडके स्मृती समिती, चतुरंग प्रतिष्ठान, नागरी सत्कार समिती, केशव सृष्टी प्रशिक्षण संकुल अशा अनेक संस्थांच्या कार्यात सिंहाचा वाटा असणारे डोंबिवलीकर मधुकर तथा अप्पा चक्रदेव (८१) यांचे सोमवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पहाटे खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिमखाना संचालक मंडळ, विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आदींनी समाजमाध्यमांवर अप्पांच्या आठवणींना उजाळा दिला. अत्यन्त मृदू,मितभाषी परंतु सतत कार्यरत असणारे अप्पा हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य. स्वच्छ, साधी राहणी आणि मोजक्या शब्दात कृतीतून व्यक्त होणारे त्यांचे व्यक्तिमत्व. समाजातील सर्व घटकांना त्यांच्यापरीने त्यांनी यथोचित सहकार्य केले. सदैव मदतीचा हात पुढे असणारे अप्पा अशी त्यांची ओळख होती.
मूर्ती लहान पण कीर्ती महान असा त्यांचा समाजमनावर ठसा होता. इमारती, घरांना लावणाऱ्या रंगांचे ते स्वतः मॅन्युफ्रॅक्चरर अशी प्रख्यात व्यावसायिक अशी त्यांची ख्याती आहे. डोंबिवलीत एमआयडीसी आणि उज्जैन येथे रंग उत्पादनाची त्यांची फॅक्टरी असून शेकडो कुशल अकुशल कामगार त्यात कार्यरत आहेत. कोरोना काळात सर्वत्र मंदी असतानादेखील अप्पांनी त्यांच्याकडील एकाही कामगाराला कामावरून कमी केले नाही, कोणाचाही पगार थकवला नाही, जेवढे होईल तेवढे सहकार्य त्यांनी सगळ्याना कामगारांना केले, असेही त्यांचे स्वभाव वेगळेपण होते. शिवमंदिर येथील वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दहिनीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. चक्रदेव वास्तव्याला असणाऱ्या दत्तनगर येथील त्यांच्या निवासस्थानी देखील शेकडो मान्यवर मंडळींनी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. शनिवारी, २ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे संध्याकाळी ४.३० वाजता अप्पा यांची शोकसभा आयोजित करण्यात आल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले.