प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: कल्याण ग्रामीण मतदारसंघातील कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी परिसरातील मनसेची शाखा पोलिसांनी बंद केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. हा प्रकार मनसेचे उमेदवार आ. राजू पाटील यांना समजताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधा-यांच्या दबावाखाली पोलिसांनी हे कृत्य केले असून आम्ही देखील उदया आमची फौज उतरवू, कायदा सुव्यवस्था राखण्याचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही. पोलिसांनी हा विभाग संवेेदनशील म्हणून जाहीर करावा अन्यथा आम्ही आहोतच असा इशारा दिला.
इथल्या समर्थनगर मधील मनसेच्या शाखेत दुपारी दोन पोलिस आले. तेथील तानाजी पाटील यांना तुमच्याबाबतीत तक्रार आहे असे सांगत शाखा बंद केली आणि तेथील मतदार यादया आणि व्होटर स्लीप ताब्यात घेऊन गेले. हा प्रकार समजताच पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. इथे कोणतेही गैरप्रकार चालू नव्हते. पोलिस असे करू शकत नाही, परंतू सत्ताधा-यांच्या दबावाखाली हा प्रकार घडला आहे. पोलिसांना हाताशी धरून सत्ताधारी राजकारण करत असतील तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू असा इशारा पाटील यांनी दिला.
सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेले पैसे वाटप आणि दबावतंत्र बंद करा, आडीवली ढोकळी संवेदनशील जाहीर करा अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली. पाटील यांनी मानपाडा पोलिसांना देखील संपर्क केला पण त्यांनी मात्र या घडलेल्या प्रकाराचा इन्कार केला.