कल्याण - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी रविवारी जाहीर झाली. यात कल्याण पूर्व मतदारसंघात आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र याला कल्याण पूर्व शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाडांसह १९ शिवसेना नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आजचा दिवस कल्याण पूर्वसाठी काळा दिवस आहे. ज्याने कल्याण पूर्व बकाल करून ठेवलं आहे. वरिष्ठांना वारंवार या गोष्टी सांगत आलोय. समस्या जैसे थे आहेत. त्यात त्याच्या कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी देऊन कल्याण पूर्वेची दुरावस्था थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं सांगत महेश गायकवाड यांनी निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे.
महेश गायकवाड म्हणाले की, कल्याण पूर्व गड हा शिवसेनेला मिळाला आहे. कल्याण पूर्वेच्या शेतकऱ्याच्या जमिनी गणपत गायकवाड यांनी बळकावला होता. हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालय त्यांना शिक्षा देईल. परंतु कल्याण पूर्व इथं अनेक समस्या आहेत. कल्याण पूर्वेत शिवसेनेचे संख्याबळ असूनही हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात आमचे नेते अयशस्वी ठरले त्यामुळे आम्ही नाराज आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटून येथील परिस्थिती सांगितली, परंतु तुम्ही युतीचा धर्म पाळा असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. आम्हाला विद्यमान आमदारांनी शिवसैनिकांवर दबाव आणण्याचं काम केले आहे. भ्रष्ट व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबात उमेदवारी दिली त्याला आमचा निषेध आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही नगरसेवक, पदाधिकारी यांची आढावा बैठक बोलावली. आमच्यातील जे इच्छुक आहेत ते ठरवू. या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असावा अशी आमची मागणी आहे. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी मोठ्या मताधिक्याने ही जागा निवडून आणू. कल्याण पूर्वमधील जनता आमदारांवर नाराज आहे. ते याठिकाणी बदल करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मागून घ्यावा अशी विनंती आम्ही वरिष्ठांना आजही करतोय असं महेश गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, आमची भूमिका ठरलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही अशा व्यक्तीचं काम करणार नाही ज्याने कल्याण पूर्वचा विकास केलेला नाही. कल्याण पूर्व भकास केलेले आहे. त्यामुळे आमचा या उमेदवारीला विरोध आहे. आम्हाला हा मतदारसंघ मिळावा ही आमची मागणी आहे. मी स्वत: महेश गायकवाड, निलेश शिंदे, विशाल पावशे इथं इच्छुक आहेत. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही येथे उमेदवार निवडून आणू असंही महेश गायकवाड यांनी म्हटलं.