कल्याण - कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील नागरिक मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडले खरे, पण मतदान यादीतून नावे डिलीट झाल्याने हजारो नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तर काही भागात मतदान करण्यासाठी लागणारी कागदपत्रे मतदारांकडे असून देखील त्यांना मतदान करता आले नाही. यासर्व प्रकारामुळे मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. असे असले तरी, मतदान करण्यामध्ये तरुणाईचा उत्साह दिसून आला.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाल, पिसवली, नेतिवली या सारख्या भागात बहुतांश मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याने या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. मतदार याद्यांमधील गोंधळामुळे भाल येथील बहुतांश मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. ज्याठिकाणी जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेत मतदान केंद्र होते. त्याठिकाणी प्रशासनाकडून मंडपाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. शाळेच्या आत ज्या ठिकाणी रांगा लावून उभे होते त्याठिकाणी ना पंखा होता ना कुलर. तरीही घामाच्या धारेत मतदान करण्यासाठी मतदार रांगेत शांतपणे उभे होते. काही भागात दुपारच्या सुमारास मंडप लावण्याचे काम सुरु होते.
सकाळपासूनच नागरिक मतदानासाठी उत्साहात घराबाहेर पडले होते. ज्या मतदान केंद्रावर ते मतदान करतात. त्या केंद्रावर गेल्यावर अनेकाना त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याचे आढळून आले. येथे उपस्थित असलेले स्वयंसेवक त्यांची नावे मतदार यादीत शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, मतदारांच्या पदरी निराशा पडली. आणि बहुतांश मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. आपले नाव कदाचित इतर मतदार संघात वर्ग करण्यात आल्याचा अंदाज असल्याने घरापासून लांब असलेल्या मतदार केंद्रावर जाऊनही मतदान करता न आल्याने मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली.
अनेक मतदारांची नावे डोंबिवली, नेतिवली, सागाव अशा भाल गावापासून दहा ते बारा किमी लांब अंतरावर आली आहेत. त्याठिकाणी जाण्यासाठी मतदारांना दोन रिक्षा करून जावे लागले. अनेक मतदार चिठ्ठी या मतदारांपर्यंत न पोचता रस्त्यात देखील फेकून देण्यात आल्याचे भाल येथील ग्रामस्थ अमित चिकनकर यांनी सांगितले.
मागील तीस वर्षांपासून भाल गावात राहत आहोत. यापूर्वी आम्ही मतदान केले आहे. परंतु, यंदा आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. तरीसुद्धा आमच्या नावापुढे डिलीट असे लिहिण्यात आल्याचे भाल येथील रहिवासी मिन्ता देवी आणि क्रीष्णा तिवारी यांनी सांगितले.