डोंबिवली: चेन्नई येथे वाको इंडिया सीनियर आणि मास्टर्स किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत सर्वोत्तम संघाचे पारितोषिक पटकावले. यात ठाणे जिल्हयातील खेळाडुंनीही सुवर्ण पदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
किक बॉक्सिंग हा खेळ पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, फुल कॉन्टॅक्ट, किक लाईट, लो किक आणि म्युङिाकल फॉर्म या अशा विविध प्रकारात खेळता जातो. १८ ते २२ ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत विविध राज्यातील १२०० खेळाडु सहभागी झाले होते. यात महाराष्ट्र संघाने २८ सुवर्ण, १५ रौप्य आणि ८ कांस्य पदक पटकाविले आहेत. यातील ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनचे खेळाडू मकरंद जोशी यांनी पॉइंट फाईट (वैयक्तिक आणि सांघिक ) अशा दोन्ही तसेच किक लाईट या प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले तर नंदिनी मानकट्टी यांनीही लाईट कॉन्टॅक्ट आणि पॉइंट फाईट (सांघिक) यात सुवर्ण पदक पटकाविले. या दोन्ही खेळाडुंना रेन्शी मोहन सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. ही राष्ट्रीय स्पर्धा ६ व्या आशियाई इनडोअर्स आणि मार्शल आर्ट गेम्स २०२३ आणि वल्र्ड कॉम्बॅक्ट गेम्स २०२३ साठी पहिल्या टप्प्यातील निवड चाचणी होती अशी माहीती असोसिएशनचे सेक्रेटरी संजय कटोडे यांनी दिली.