Shrikant Shinde: कल्याण-महाविकास आघाडी सरकारला जे अडीच वर्षात करता आले नाही. ते शिंदे-फडणवीस सरकारने अवघ्या पाच महिन्यात करुन दाखविले आहे. कल्याणमध्ये बेराजगारांना रोजगार देण्यासाठी महारोजगार मेळावा आयोजित केला असता महाविकास आघाडी सरकारकडून सरकारच्या विरोधात महामोर्चा काढून जनतेला वेठीस धरले जात आहे. हा विरोधाभास आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टिका कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज येथे केली. कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात गुणगोपाळ मैदानात पं. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी टीका केली.
यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले की, या आधीचे सरकार वर्क फ्रॉम होम होते. आत्ताचे सरकार प्रत्यक्षात जनतेत जाऊन काम करीत आहे. सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकारची तडफड होत आहे. त्यामुळेच त्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात महामोर्चा काढला आहे. मात्र शिंदे फडणवीस सरकारकडून पायाभूत सोयी सुविधा पुरविणारे प्रकल्प उभारण्याकरीता निधी दिला जात आहे. तसेच कल्याणमध्ये महारोजगार मेळावा आयोजित करुन काम नसलेल्या हातांना काम देण्यात येत आहे.
या मेळाव्यात विविध प्रकारच्या 75 खाजगी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. विविध प्रकारच्या जॉबसाठी ६ हजार तरुण तरुणींनी त्यांची नोंदणी केली. दुपारी तीन वाजेर्पयत मान्यवरांच्या हस्ते जवळपास २ हजार ५०० तरुण तरुणांना ऑफर लेटरचे वाटप करण्यात आले. अंबरनाथ पासून ठाण्यापर्यंत आठ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे आहे. त्यांचे अपग्रेडेशन करण्याकरीता २५ कोटीचा निधी द्यावा अशी मागणी खासदार शिंदे यांनी मंत्री लोढा यांच्याकडे यावेळी केली. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून १६० नवे उद्योगजक निर्माण होणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी योजनेतून असंघट कामगारना प्रत्येकी ५ हजार रुपये दिले जाणार आहे. त्याचे ५ हजार लाभार्थी शोधण्यात आले असून त्यांना ५ हजार रुपयांसह ७ हजार रुपयांचे किटही पुरविले जाणार आहे.