डोंबिवली: महावितरणच्याकल्याण परिमंडलात १वीज वितरण यंत्रणेच्या पावसाळापूर्व देखभाल व दुरुस्तींच्या कामांना वेग देण्यात आला आहे. यात उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्या, उपकेंद्र आणि वितरण रोहित्रांच्या देखभाल व दुरुस्तीचा समावेश आहे. जेणेकरून मान्सुनपूर्व वादळवारा व पावसाळ्यात खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची तीव्रता कमी होण्यास मदत मिळेल असा दावा करण्यात आला आहे. वीजवाहिनीत अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, पिन व डिस्क इन्सुलेटर बदलणे (चिमण्या), खांबांचा आधार असलेल्या स्टे चे इन्सुलेटर बदलणे, जीओडी दुरुस्ती, वाकलेले खांब सरळ करणे व पडलेले खांब बदलणे, ढिल्या पडलेल्या वीजवाहिन्यांना खेचून पुरेसा ताण देणे, लोखंडी खांबांना अर्थिंग करणे, खराब झालेल्या तारा बदलणे, वीजवाहिन्यांना गार्डिंग बसवणे, लघुदाब वीजवाहिन्यांमध्ये स्पेसर बसवणे आदी कामे वीजवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीत सुरू आहेत.
तर कॅपॅसिटर बदलणे, उपकेंद्राला अर्थिंग करणे, बॅटरी दुरुस्त करणे, आयसोलेटर दुरुस्त करणे, ऑईलची पातळी तपासून योग्य पातळी राखणे, लाईटनिंग ॲरेस्टर बदलणे, नादुरुस्त सीटी-पीटी बदलणे (करंट आणि पोटेन्शिअल ट्रान्सफॉर्मर), ब्रेकरची दुरुस्ती, वाढलेले गवत व झुडूपे काढून टाकणे आदी कामे उपकेद्रांच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये केली जात आहेत. पावसाचे पाणी साचणाऱ्या भागात फिडर पिलर व रोहित्रांची ऊंची वाढवण्याची कामेही यात करण्यात येत आहेत.
याशिवाय रोहित्रांना अर्थिंग करणे, ऑईलची पातळी तपासून ती योग्य राखणे, नादुरुस्त केबल बदलणे, सिलिका जेल बदलणे, वितरण बॉक्स बदलणे, रोहित्र गासकेट बदलणे (रबरी कॅपिंग), फिडर पिलरची दुरुस्ती आदी कामे वितरण रोहित्रांच्या देखभाल-दुरुस्तीच्या माध्यमातून सुरू आहेत. संबंधित भागातील वीज ग्राहकांना याची पूर्वकल्पना देणारे संदेश त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून त्या-त्या भागात देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली जात आहेत. या कामांसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.