डोंबिवली: मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेच्या आवारात चोरी आणि लुटमारीच्या घटनांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. गुन्हे प्रतिबंध आणि शोध पथक (सीपीडीएस) अंतर्गत आरपीएफ कर्मचारी गुन्हेगारीला आळा घालण्याच्या प्रयत्नात गाड्या आणि स्थानकांवर देखरेख आणि गस्त घालण्यासाठी सतर्क आहेत.
बुधवारी वडाळा रोड येथील आरपीएफ आणि सीपीडीएस कर्मचाऱ्यांना एक सूचना मिळाल्यावर, वडाळा रोडवरून कुर्ल्याकडे एका संशयित व्यक्तीचा पाठलाग केला आणि तो ट्रेनमधून खाली उतरला आणि पळून जाऊ लागला तेव्हा त्याला कुर्ला स्थानकावर पकडण्यात आले. रिझवान शेख नावाच्या आरोपीने चौकशीत प्रवाशाकडून मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून रु. २२,९९९/- किमतीचा ओप्पो मोबाईल जप्त करण्यात आला.
गुरुवारी अंबरनाथ स्थानकावर तैनात असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना १४.०२ वाजता ठाणे येथे जाणाऱ्या ट्रेनमधून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीबद्दल सूचना देण्यात आल्या. वर्दीधारी दोघांनी पाठलाग करून गुन्हेगाराला पकडले. दिपक वाघरी नावाच्या आरोपीने चौकशीत ट्रेनमधील प्रवाशांचे मोबाईल चोरल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून २ रिअलमी मोबाईल जप्त करण्यात आले.
गुरुवारी कल्याण स्थानकावरील आरपीएफ आणि सीपीडीएस कर्मचाऱ्यांनी, कल्याण स्थानकाच्या परिसरात संशयास्पद रीतीने फिरत असलेल्या व्यक्तीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. दशरथ ठाकूर नावाच्या आरोपीने चौकशीत कल्याण स्थानकात प्रवाशांचे मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून रु.३१,८००/- किमतीचे २ सॅमसंग मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
भुसावळ स्थानकावर तैनात असलेल्या आरपीएफ आणि सीपीडीएस कर्मचाऱ्यांना स्थानकाच्या परिसरात एक व्यक्ती संशयास्पद रीतीने फिरताना दिसली. कृष्णा सावंत नावाच्या आरोपीने चौकशीत सचखंड एक्स्प्रेसमधील प्रवाशाकडून मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून एक विवो मोबाईल फोन जप्त करण्यात आला. भुसावळ स्थानकावर तैनात असलेल्या आरपीएफ आणि सीपीडीएस कर्मचाऱ्यांनी, एका प्रवाशाने दिलेल्या माहितीवर कारवाई करत, स्थानकाच्या परिसरात संशयास्पद रीतीने फिरत असलेल्या एका व्यक्तीला पकडले. चौकशीत समीर पठाण नावाच्या आरोपीने अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात झोपलेल्या प्रवाशाकडून मोबाईल चोरल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून एक विवो मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
वरील सर्व आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ अन्वये खटला चालवण्यासाठी संबंधित अधिकार क्षेत्रातील शासकीय रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रेल्वे, स्थानक आणि रेल्वे परिसरात चोरी आणि लुटमारीच्या घटना तपासण्यासाठी आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांची एक समर्पित टीम नेहमीच सतर्क असते. मध्य रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक १३९ वर डायल करून चोरी किंवा दरोड्याच्या कोणत्याही घटनेची तक्रार करावीअसे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.