कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सही शिक्क्यांचा गैरवापर करुन महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासविले. त्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील 65 बिल्डरांच्या विरोधात दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रेरा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी या प्रकरणातील तक्रारदार संदीप पाटील यांनी केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते आणि वास्तूविशारद संदीप पाटील यांनी एका प्रकरणात एका बिल्डरने महापालिकेची परवानगी मिळविल्याचे भासवून रेराकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. महापालिकेने अशी परवानगीच दिली नसून त्याने बनावट कागदपत्रे तयार करुन खोटी परवानगी तयार केली. त्या परवानगीच्या आधारे रेराकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या प्रकरणानंतर पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका न्यायप्रविष्ट असताना त्यांनी माहिती अधिकारात महापालिकेकडे माहिती मागविली. अशा किती प्रकरणात महापालिकेसह रेराची फसवणूक झाली आहे. महापालिकेने 68 प्रकरणात हा प्रकार घडला असल्याची माहिती पाटील यांना दिली.
पाटील यांनी ही माहिती उच्च न्यायालयात सादर केली. त्यापश्चात सगळ्य़ात प्रथम महापालिकेच्या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिस ठाण्यात 27 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर डोंबिवली पोलिस ठाण्यात 38 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. आत्तार्पयत 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर रेरा जागी झाली. रेराने 52 प्रकरणातील नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई केली. त्यावेळी तक्रारदार पाटील यानी अन्य उर्वरीत प्रकरणात रेराने निर्णय का घेतला नाही असा सवाल उपस्थित केला. दरम्यान पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपासाकरीता एसआयटी नेमली. त्याचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला आहे. आत्ता तक्रारदार पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे विनंती अर्ज करीत या प्रकरणात रेरा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी केली आहे.