कल्याण-डोंबिवली एमआयडीसीतील अमूदान रासायनिक कंपनीतील स्फोट प्रकरणी कंपनी मालक मलय मेहता याला पोलिसांनी काल अटक केली होती. मेहता याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मेहता याला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कल्याण जिल्हा सह दिवाणी न्यायाधीश एस. ए. पठाण यांच्या समोर आरोपी मेहता याला पोलिसांनी आज हजर केले होते. या वेळी पोलिसांनी मेहता यांच्या कंपनीतील भीषण स्फाेटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ६४ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. तसेच आसपासच्या नागरी वस्तीसह अनेक मालमत्तांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्यामुळे तपास कामाकरीता १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली. आरोपीच्या वकिलांनी कंपनी मालकाने कंपनीतील उत्पादन प्रक्रियेसाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेतलेल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही असा युक्तीवाद केला.
त्याचबरोबर कंपनीत ज्या दिवशी दुपारी स्फाेट झाला. त्या दिवशी मलय मेहता हे कंपनीत जायला निघाले होते. ४५ मिनिट त्यांना पोहण्यासाठी उशिर झाला. अन्यथा त्याच्यासोबतही अघटीत घडले असले अशी माहिती सांगण्यात आली. सरकारी वकिलांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळे आरोपीची चाैकशी करण्यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली. न्यालालयात काय युक्तीवाद झाला याविषयी सरकारी वकिलांनी बोलण्यास नकार दिला. मात्र या प्रकरणात मध्यस्थी याचिका करणारे वकिल आकाश बोईनवाड, प्रियेश सिंग आणि दयानंद प्रजापती यांना न्यायालयाने सुनावणी दरम्यान मुद्दा उपस्थित करण्याची संधी दिली. या तिन्ही वकिलांनी स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ८ ते १० इतकी आहे. तसेच जखमींचीही संख्या मोठी आहे. अनेक मृतदेहांची अद्याप आेळख पटलेली नाही. त्यामुळे आरोपीला जास्त दिवसांची पोलिस कोठडी दिली जावी.
दरम्यान मलय मेहता याला पोलिस अटक करणार म्हणून त्याने अटक पूर्व जामीनीची तयारी केली होती. त्याचबरोबर तो गुजरातला पळून जाण्याच्या बेतात होता. त्यापूर्वीच पोलिस पथकाने त्याच्या मुसक्या आवळून त्याला आज कल्याण न्यायालयात हजर केले.