कल्याण डोंबिवली शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आणि सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरिकांवर देखील जोमाने कारवाई सुरू आहे. असे असले तरी बहुतांश नागरिक अजूनही विना मास्क वावरत आहेत. कल्याणमध्ये कारवाईदरम्यान बाईकवरून विनामास्क जाणाऱ्या तरुणाला अडवणा-या एका पोलीस अधिका-याला बाईक स्वाराने रस्त्यावरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कारवाई वरून नागरिक आणि पोलीस व पालिका कर्मचारी यांच्यात काही ठिकाणी शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. मात्र, कल्याणमध्ये विनामास्क फिरणाऱ्या एका मुजोर बाईकस्वाराने सर्व हद्द पार केल्याचे दिसून आले आहे. हा तरुण विनामास्क फिरत असल्याने पोलीस अधिकारी औदुंबर म्हस्के यांनी त्याची बाईक अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने गाडी न थांबवता पोलिसाला रस्त्यावर फरफटत नेलं. या घटनेत पोलीस अधिकारी म्हस्के गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा चौकात गुरुवारी संध्याकाळी आपले कर्तव्य बजावत असताना एक तरुण विनामास्क दुचाकीवरून येताना दिसला. यावेळी म्हस्के यांनी तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना न जुमानता रस्त्यावरून फरफटत पुढे लांब घेऊन गेला. या घटनेत म्हस्के यांच्या डोळ्यासह हाता-पायाला दुखापत झाली आहे. एकाखाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
मुजोर बाईकस्वार नितीन गायकवाड याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो वाडेघरचा राहणारा असून पानटपरी चालक आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी गणेश व्यवहारे यांनी सांगितले की, यात पोलिसांची काही चूक नाही. ते कर्तव्य बजावित असताना हे घडले. ही घटना पाहून आम्ही काही तरुणांच्या मदतीने जखमी पोलिस अधिकाऱ्यास रुग्णालयात नेले.