कल्याण - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांचे निर्माते अशोक म्हात्रे यांचे आज वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. ते डोंबिवली येथील पाथर्लीचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक म्हात्रे हे शांतीनगर विद्यालयाचे संस्थापकीय अध्यक्ष होते. तसेच डोंबिवलीतील आखिल भारतीय आगरी महोत्सवाचे ते सल्लागारही होते.
म्हात्रे यांनी ‘शपथ तुला बाळाची’ या मराठी चित्रपटाची निर्मिती 1989 साली केली होती. हा चित्रपट सामाजिक होता. त्यांचा हा चित्रपट चांगला नावाजला गेला. त्यामुळे त्यांचे नाव मराठी चित्रपट सृष्टीत आदराने घेतले जाऊ लागले. शपथ तुला बाळाची या चित्रपटात दिग्गज कलाकार होते. हा चित्रपट गोविंद कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला होता. त्यानंतर त्यांनी ‘मुक्ता’ या जातीय व्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘मुक्ता’ या चित्रपाटेच दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले होते. या चित्रपटात अविनाश नारकर, सोनाली कुलकर्णी, श्रीराम लागू या दिग्गज कलाकारांनी काम केले होते. या चित्रपटात उच्च जातीतील मुलगी व खालच्या जातीतील मुलगा यांच्यातील प्रेम यावर प्रकाश टाकण्यात आला होता. पांढरपेढय़ा सदाशिवी पेठी साहित्याला सुरुंग लावणारे कविवर्य पद्मश्री नामदेव ढसाळ यांची रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यानी ही कविता या चित्रपटात चित्रित करण्यात आली होती. या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. अशोक म्हात्रे यांचा ‘मुक्ता’ हा चित्रपट हा मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड मानला जातो. म्हात्रे यांच्या चित्रपट निर्मितीमुळे डोंबिवलीचे नाव चित्रपट सृष्टीत झळकले होते. साता समुद्रापार त्यांच्या नावाचा लौकीक पसरला होता.