कल्याण : २७ फेब्रुवारी हा दिवस कविवर्य वि.वा.शिरवाडकर यांचा जन्म दिवस महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. शहरातील शाळांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आजच्या पिढीला घडवताना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे देखील महत्त्वाचे आहे. आपण प्रगतीचे उंच शिखर गाठले तरी आपण आपली संस्कृती विसरता कामा नये ही गोष्ट लक्षात घेऊन कल्याणमधील दि केंब्रिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये सोमवारी मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्वच विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत दिसत होते.
आपली मराठी संस्कृती जोपासणारी व लुप्त होत जाणारी आपली संस्कृती याविषयीचे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांपुढे सादर करण्यात आले. इयत्ता दुसरीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये कोणी वासुदेव झालं होत. बहुतेक मुली नऊवारी साड्या परिधान करून आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी अभिमान गीत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक नाट्यदेखील प्रस्तुत केले. यावेळी, सर्व शिक्षिकादेखील पारंपारिक वेशभूषेत होत्या. यामुळे, शाळेतील वातावरणदेखील पारंपारिक संस्कृतीत रंगून गेले होते.
पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. लेझीम साहित्याचा वापर करत महाराष्ट्राची संस्कृती जपत मराठमोळ्या वेशभूषेत मुलामुलींनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.