मुरलीधर भवार, कल्याण: ठाणे जिल्ह्यासाठी एकच परिवहन सेवा असावी या मागणीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. जिल्ह्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ््यांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे.
एकात्मिक परिवहन व्यवस्थेची भूमिका मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार शिंदे यांनी यापूर्वीच घेतली होती. कल्याण डोंबिवलीच्या पहिवहन समितीचे माजी सभापती राजेश कदम यांनी देखील हीच भूमिका ते सभापती असताना घेतली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम हा आर्थिक तोट्यात आहे. उल्हासनगरला परिवहन सेवा नाही.
भिवंडी महापालिकेकडेही परिवहन सेवा उपक्रम नाही. अंबरनाथ आणि बदलापूर पालिका हा उपक्रम चालवू शकत नाही. केवळ ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांचे परिवहन उपक्रम सक्षम रित्या सुरु आहेत. एकच परिवहन सेवा केल्यास जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगररपालिका हद्दीतील नागरीकांना सार्वजनिक वाहतूकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होऊ शकतो. महानगर निगम प्राधिकरण स्थापन झाल्यास त्यातून बस सेवेचे रस्त्यावरील संचलन वाढीस लागून खाजगी वाहतूकीसाठी आळा बसण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रदूषण आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सूटका होण्यास मदत होऊ शकते. सर्व महापालिका आणि नगरपालिकांनी एकात्मिक परिवहन सेवेत सहभागी होण्याचे ठराव करुन सरकार दरबारी पाठविले आहेत. या ठरावाची अंमलबजावणी सरकारकडून केली जावे याकडे खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात लवकर सर्व महापालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे असे सांगितले.
पाण्याचा कोटा वाढवून मिळण्याची मागणी
२७ गावातील नागरीकांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. ज्या प्रमाणे गावातील नागरीकांना पाणी कमी दाबाने मिळते. ती स्थिती बड्या गृहसंकुलाची आहे. गोळवली, दावडी, नांदिवली या पट्ट्यात पाणी कमी येते. ही समस्या लक्षात घेता खासदार शिंदे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी आणि महापालिका अधिकाऱ््यांसाेबत बैठक झाली. या बैठकीस राजेश कदम, प्रफुल्ल देशमुख, बंडू पाटील उपस्थित होते. लांबलेला पावसाळा पाहता पाण्याचे नियोजन करुन एमआयडीसीने पाण्याचे वितरण सम प्रमाणात करावे. पाण्याचा दाब वाढवावा. त्याचबरोबर पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी खासदार शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.