लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: शाळेची फी न भरल्याने वर्गात न बसविता बाजुकडील वर्गात एकटेच तीन तास बसविलेल्या दहावीतील विद्यार्थ्याला भोवळ आल्याची घटना येथील एमआयडीसीमधील ग्रीन इंग्लिश हायस्कूलमध्ये मंगळवारी घडली. फी न भरल्याने शाळेने वारंवार त्रास दिल्याने मानसिक स्थिती ढासळली आणि मुलाला भोवळ आल्याचा आरोप पालकांनी केला असून याप्रकरणी त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. दरम्यान शाळा व्यवस्थापनाने पालकांचे आरोप फेटाळले आहेत.
डोंबिवली पुर्वेकडील आजदेपाडा परिसरात राहणारे मनोज गिरी यांचा मुलगा चंदन हा एमआयडीसी निवासी परिसरातील ग्रीन इंग्लिश हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्षात शिकत आहे. नववी इयत्ता पास केल्यावर सध्या दहावीचे क्लास सुरू आहेत. मंगळवारी शाळेत आलेल्या चंदनला शिक्षकांनी वर्गात न बसविता दुसऱ्या वर्गात बसायला सांगितले. तुझ्या पालकांनी दोन वर्षाची फी भरली नाही, त्यांना बोलावून घे तो पर्यंत तुला इथेच बसावे लागेल असे सांगितले. चंदन जवळपास तीन तास एकटाच त्या वर्गात बसला होता. यात त्याची तब्येत बिघडली आणि त्याला भोवळ आल्याचा आरोप त्याचे वडील मनोज यांनी केला आहे.
13 एप्रिलला देखील शाळेत चंदनला उभे करून ठेवले होते. त्याच्याबरोबर अन्य काही विद्याथ्र्यानाही शाळेने अशी शिक्षा केली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान मनोज यांचे आरोप शाळा व्यवस्थापनाने फेटाळले आहेत. चंदनची दोन वर्षाची 26 हजार रूपये फी भरण्यात आलेली नाही. याबाबत त्याला बाजुच्या वर्गात बसण्यास सांगून पालकांना फोन करून बोलावून घेण्यास सांगितले. मधल्या सुट्टीत तो खेळायला देखील गेला होता. मात्र शाळा सुटल्यावर जिन्यातून उतरताना त्याला चककर आली. मानसिक त्रास दिल्याचा पालकांचा आरोप चुकीचा आहे, अशी प्रतिक्रिया शाळेचे डोंबिवली प्रोग्रेसिव्ह ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अरूण पाटील यांनी दिली.