- प्रशांत माने
कल्याण : वाहनाच्या टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने धावत्या वाहनाचा टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनांचे अपघात माेठ्या प्रमाणात होत आहेत. अशा एक ना अनेक घटना राज्यासह देशातही वारंवार घडत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत या घटना प्रामुख्याने घडताना दिसतात. मे महिन्यात तापमान साधारण ४० अंशांच्या वर गेल्याचे आजपर्यंत अनुभवास मिळाले आहे. यंदा एप्रिलच्या सुरुवातीलाच ते ४० ते ४४ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे वाहन घेऊन बाहेर पडताना टायर तपासून मगच पुढे निघा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत वाहन धावत असताना टायरमधील हवेचा दाब अचानक वाढतो. त्यातच सिमेंट आणि डांबराचे रस्ते तापत असल्याने टायरचे घर्षण होते. सिमेंटच्या रस्त्यावर घर्षणाचे प्रमाण सर्वाधिक असते. सातत्याने होणाऱ्या घर्षणातून कमजोर असलेले टायर फुटण्याची शक्यता अधिक असते. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टायर फुटून भीषण अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे शक्यतो बाहेर पडताना टायरमधील हवा तपासून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर वेगावरही नियंत्रण असणे आवश्यक आहे.
तापमान ४० अंशांवर
राजस्थान, गुजरातकडून वाहणाऱ्या अतिउष्ण आणि कोरड्या वाऱ्यामुळे काही दिवस तापमानात वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास आहे.
टायर फुटून अपघात
तीन दिवसांपूर्वीच कल्याण-शीळ रोडवर एका कारचा पुढील टायर फुटून अपघात झाल्याची घटना घडली. यात कोणालाही दुखापत झाली नाही. वेगावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहनांची तपासणी करणे गरजेचे आहे. कल्याण-शीळ मार्गावर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी वाहनांचा टायरही फुटल्याची घटना नुकतीच घडली आहे.
उन्हाळ्यात काळजी कशी घ्याल?
उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्याल? रबराला स्वत:चे एक आयुष्य असते. त्यामुळे वेळीच टायर बदलणे गरजेचे आहे. ४० हजार मैल प्रवास झाल्यास बदलणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत नायट्रोजन हवा भरण्यात यावी. कारण ही हवा थंड असते. नियमित व्हील अलायमेंट करावे, वाहनांची वेगमर्यादा पाळणे. वेळोवेळी टायरमधील हवा तपासावी. ती २८, ३०, ३२ या प्रमाणातच असावी. वाहनाच्या मेंटेनन्सकडेही लक्ष द्यावे.
दुपारी वाहन चालवा, पण काळजी घ्या
दुपारी वाहन चालवा, पण दीर्घ प्रवासात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हामुळे रस्ते तापलेले असतात टायरचे घर्षण अधिक होते. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा, वाहनांच्या टायरमध्ये हवा योग्य प्रमाणात आहे की नाही, हे नियमितपणे तपासा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उन्हाळ्यात शक्यतो टायरमध्ये नायट्रोजन हवा भरावी. वाहनाच्या मेंटेनन्सकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. वेळच्या वेळी व्हील अलायमेंट करावे. टायरमध्ये आवश्यक असणाऱ्या हवेचे प्रमाण योग्य ठेवावे.
- अनिरुद्ध संभूस, व्हेइकल वर्कशॉप चालक, डोंबिवली