डोंबिवली: एमआयडीसी मधील मिलापनगर तलावातील पाणी खराब/गढूळ झाल्याने त्यातील असंख्य मासे, कासव यांना नीट तळाशी ऑक्सिजन मिळत नसल्याने ते सकाळी सूर्यप्रकाशात सदर तळ्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन ऑक्सिजन मिळण्यासाठी धडपड करीत दिसत असल्याने सकाळी फिरायला आलेल्या पादचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.
तेथील दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी त्याबाबत माहिती देताना सांगितले की, जलप्राण्यांना तलावाचा तळाशी पण ऑक्सिजन मिळाला पाहिजे पण या खराब/गढूळ पाण्याअभावी ऑक्सिजन मिळत नाही असे वारंवार निदर्शनास आले असल्याचे ते म्हणाले. आता उन्हाळा सुरू असल्याने जर पुढे अजूनच पाणी खराब झाले तर आणि जलप्राण्यांना यापुढे योग्य ऑक्सिजन मिळाला नाही तर ते सर्व जलप्राणी मरण पावण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. काही वर्षांपूर्वी याच तलावात अनेक वेळा मासे, कासव मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले होते. त्या तलावाचा सुशोभीकरणसाठी आणि साफसफाईसाठी अनेक वेळा लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.
गेल्या महिन्यातच या तलावाची साफसफाई करण्यात आली होती. त्यावेळी अर्धे अधिक तलावातील खराब पाणी बाहेर काढण्यात आले होते. परंतु तलावातील तळाचा गाळ काढला नव्हता. त्या तलावाच्या मध्यभागी एखादी उंच सपाट जागा तयार करून ठेवली तर त्यावर उन प्रकाशात कासवे येऊन बसतील. कासवांच्या पाठीला चांगला सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. त्या तलावात काही बेजबाबदार नागरिकांकडून निर्माल्य, कचरा फेकला जात असल्याने तलावातील पाणी खराब होण्यास भर पडत असल्याचे नलावडे म्हणाले. एकूणच तो तलाव काही वर्षात नामशेष होण्याची भीती असून वेळीच कल्याण डोंबिवली महापालिकेने यावर लक्ष देऊन एखादा कंत्राटी सुरक्षा रक्षक ठेवणे आवश्यक असल्याची मागणी मिलापनगर रहिवाशी करत असल्याचे नलावडे म्हणाले.