कल्याण: धनुष्यबाण हे बाळासाहेबांचे आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कल्याणमध्ये बोलताना व्यक्त केला.तसेच त्यांनी भारत जोडे यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली. कोकण शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमेतील माऊल हॉलमध्ये काल जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शिक्षण मंत्री केसरकर यांनी उपरोक्त दावा सभेच्या पश्चात पत्रकारांशी बोलताना केला.
या सभेला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण, पदाधिकारी अनिल बोरनारे, आर. पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख रवी पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेचा आम्हांला पाठींबा असल्याचे केसरकर यांनी सांगितले. भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे याच्या प्रचार सभेत मनसेचे आमदार राजू पाटील यांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र कालच आमदार पाटील यांनी अजुन पाठींब्याचा निर्णय झाला नसल्याचे म्हटलं होतं.दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित आहे, मागील सरकारच्या काळात पण त्याला उशीर झाला होता असे देखील केसरकर म्हणाले.
बाळासाहेबांनी असे म्हटले होते की मला एक दिवसाचा पंतप्रधान करा मी काश्मीर चे ३७० चे कलम रद्द करतो आणि त्याच काश्मीर मध्ये जावून ज्यावेळी शिवसेना काँग्रेसचे स्वागत करते तेव्हा बाळासाहेबांना काय वाटले असेल असा टोला संजय राऊत यांना केसरकर यांनी लगावला. शिवजयंती पूर्वी सरकारमध्ये उलथापालथ होणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो याविषयी केसरकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ते दावे नेहमीच करतात त्यांचे दावे नेहमी फोल ठरतात. स्वप्न स्वप्न बघण्यात काही चुकीचं नसतं जे झोपतात ते स्वप्न बघतात त्यामुळे त्यांनी स्वप्न बघत राहावेत आम्ही जागेपने जनतेसाठी काम करत राहू असे मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचे आहे.