डोंबिवली: ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर हे नाव माहिती नसेल असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. आपल्या सहजसुंदर अभिनय, प्रभावी संवादफेक आणि खुसखुशीत लेखणीच्या माध्यमातून दिलीपजी गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांचं मनोरंजन करत आहेत, असे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रभावळकर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांचा यथोचित सन्मान केला. रंगप्रभावळीचा सन्मान, डोंबिवलीचा अभिमान अशा शब्दांत चव्हाण यांनी गौरव केला. निमित्त होते ते श्रीकला संस्कार न्यास, श्री लक्ष्मीनारायण संस्था आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येणारी बालनाट्य स्पर्धेचे. यंदा दिलीप प्रभावळकर यांना ती स्पर्धा समर्पित करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने बुधवारी प्रभावळकर यांची भेट झाली, तसेच त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली हे डोंबिवलीकर रसिक म्हणून समाधान वाटल्याचे चव्हाण म्हणाले. त्यांच्यासारखे रंगकर्मी मराठी भाषेला अधिकाधिक समृद्ध करत असतात. अशावेळी बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यामुळे बच्चेकंपनीला त्यांच्या कार्याची ओळख होते. शिवाय दिलीप प्रभावळकर यांच्याकडून होणाऱ्या कौतुकामुळे आपल्या मुलांचा उत्साह वाढतो, तसेच मार्गदर्शनामुळे त्यांना आपली आवड जोपासण्याची दिशा मिळते, ही बाब अतिशय स्तुत्य आहे. आपल्या पुढील पिढीमध्ये नाटकाचे संस्कार रुजवण्यासाठी बालनाट्य हे फार प्रभावी माध्यम आहे.
श्रीकला संस्था गेली ४१ वर्षे डोंबिवलीत ही बालनाट्य स्पर्धा भरवत आहे. पूर्वी आदरणीय कै. सुधाताई साठे आणि अजूनही दीपाली काळे या अत्यंत पोटतिडकीने डोंबिवलीतून ही बालनाट्य चळवळ चालवत आहेत. डोंबिवलीकर परिवार म्हणून आम्ही कायम सोबत असतोच असे चव्हाण म्हणाले. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बालरंगकर्मींना आपली कला सादर करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळत आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. श्रीकलासारख्या संस्था हीच डोंबिवलीचे सांस्कृतिक वैभव टिकवुन ठेवत आहेत आणि वाढवत असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर श्री गणेश मंदिर संस्थानाच्या अध्यक्षा अलका मुतालिक, ओंकार एज्युकेशन शाळेच्या संस्थापिका दर्शना सामंत, माधव जोशी, श्रीकला संस्कार केंद्राच्या अध्यक्षा ज्योती दाते आदी उपस्थित होते.
मला या नाट्यस्पर्धेला बोलावले, तिथे अहोरात्र झटणारी युवक, युवती आणि त्यांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ अशा संस्कार असलेल्या वातावरणात मी आलो, मला फार समाधान आनंद वाटला. मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही साधेपणा डोंबिवलीची संस्कृती वाढवणारा आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व बाल कलाकारांना शुभेच्छा, स्पर्धा ही निमित्त असते, त्यात सहभागी होऊन बरच काही शिकायला मिळते, डोंबिवलीकरांनी सन्मान केला त्याचाही निश्चित आनंद आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांनी केले.