कल्याण: मागील काही दिवसांपूर्वी स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहान मुलाचे प्राण वाचवणारा पराक्रम वीर म्हणून देशात ओळख झालेल्या मयूर शेळके या युवकावर देशातून कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव अजूनही सुरूच आहे. कल्याण पुर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील सोमवारी मयुरची भेट घेतली. तसेच त्याला बक्षीस स्वरूपात एक धनादेश देखील सुपूर्द केला.
एक अंध महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन वांगणी प्लॅटफॉर्म वरून जात असताना अचानकपणे तो लहानगा ट्रेक वर पडला. त्याचवेळी एक एक्स्प्रेस तिथून जात होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ड्युटीवर असलेल्या पॉईंटमन मयूर शेळके याने या मुलाचे अतिशय फिल्मी स्टाईल प्राण वाचवले. काही सकेंद कमी जास्त झाले असते तर अनर्थ घडला असता. मात्र अशाही परिस्थितीत मयूरने त्याचे प्राण वाचवले. त्यासाठी त्याने केलेल्या कामगिरी बद्दल स्वतः आमदारांनी त्याची भेट घेऊन त्याच्याशी बातचीत देखील केली. तसेच त्याचा सन्मान करीत त्याला शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान आमदारांनी मयूरला एक धनादेश बक्षीस म्हणून सुपूर्द केला. अश्या माणसांचे कौतुक करावे तितकेच कमी अशी भावना आमदारांनी व्यक्त केली.