डोंबिवली : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला हाेता. मात्र, स्थानिक राजकारणात मनसेचे आमदार राजू पाटील आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सतत शाब्दिक चकमक सुरू असते. मात्र, बुधवारी गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे अचानक मनसेच्या कार्यालयात पोहाेचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवलीत भव्य स्वागतयात्रा काढण्यात आली. या स्वागतयात्रेची मुहूर्तमेढ २५ वर्षांपूर्वी रोवली गेली. रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने बुधवारी डोंबिवलीतील स्वागतयात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीचे ग्रामदैवत गणेश मंदिरात दर्शन घेतले. स्वागतयात्रेच्या व्यासपीठावर आमदार राजू पटील हेही उपस्थित होते.
पाटील गेले शिंदे यांच्या ताफ्यापर्यंतजवळच मनसेचे मध्यवर्ती कार्यालय असून, कार्यक्रम संपताच मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार शिंदे यांनी मनसेचे कार्यालय गाठले. कार्यालयात आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. सार्वजनिक बांधकाममंत्री आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण हेही कार्यालयात पोहाेचले. त्यानंतर आमदार पाटील हे मुख्यमंत्री शिंदे यांना सोडण्यासाठी त्यांच्या ताफ्यापर्यंत गेले आणि त्यांना निराेप दिला. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली हाेती.