डोंबिवली: दिवा रेल्वे स्थानकाहुन दिवा सीएसटी लोकल चालू करण्यासाठी माझ्यासह ,आमदार राजू पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधी देखील प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे होम प्लॅटफॉर्म, लांब पल्ल्याच्या गाड्याना थांबा देण्याची प्रवाशांची मागणी आहे याबाबत देखील पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
दिवा रेल्वे स्टेशनच्या विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे , आमदार राजू पाटील सोमवारी दिव्यात आले होते. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अमृत भारत स्टेशन अंतर्गत विविध रेल्वे स्थानकांचा कायापालट सुरू आहे.
कल्याण लोकसभेमधील दिवा स्थानकात ४५ कोटी रुपये, मुंब्रा मध्ये १४ कोटी रुपये आणि शहाड मध्ये तितकाच निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलाय. जेणेकरून या ठिकाणी या रेल्वेस्थानकांचा कायापालट होईल व प्रवाशांना सुविधा उपलब्ध होतील असे सांगितले. यावेळी बोलताना शिंदे यांनी मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशभरात ५५४ रेल्वे स्टेशनचे अमृत भारत स्टेशन कायापालट करण्याचा कार्यक्रम होणार आहे. याच योजनेअंतर्गत सोमवारी दिवा येथे भूमिपूजन झालं.
रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळ विकसित करण्यासाठी एकटया महाराष्ट्राला १५५४० कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. त्यामध्ये देशभरातील ५५४ रेल्वे स्टेशन मधील १२६ रेल्वे स्टेशन फक्त महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्र साठी खूप मोठा दिवस आहे. मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात रेल्वे स्थानकांचा कायापालट होतोय त्यासाठी शिंदेंनी मोदी यांचे आभार मानले.