कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नेतिवली टेकडीवरील घरे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्वखर्चातून रंगविली आहेत. मात्र केडीएमसीने त्यांच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेवर नेतीवली टेकडीवरील रंगविलेल्या घरांचे छायाचित्र छापले आहे. दरम्यान न केलेल्या कामाचे श्रेय लाटत 'करुन दाखविल्या'च्या केलेल्या घोडचुकीबाबत मनसे मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी केडीएमसीला लक्ष्य केले आहे. या प्रकाराबद्दल त्यांनी मनपाचे उपरोधिक आभार मानत अभिनंदन केले आहे.
मनपा हद्दीतील झोपडीधारकांना केडीएमसीकडून सोयी सुविधा पुरविल्या जात नाहीत. मनपाकडून सोयी सुविधा पुरविल्या जात नसताना नेतिवली टेकडीवरील घरे रंगविण्यासाठी मनसेचे आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला. स्वखर्चातून त्यांनी टेकडीवरील नागरीकांना त्यांच्या घराची रंगरंगोटी करुन दिली. केडीएमसीने आमदार पाटील यांच्या कामाची दखल घेतली. मात्र त्याचे छायाचित्रही केडीएमसीच्या अर्थ संकल्पाच्या पुस्तिकेवर छापले. केडीएमसीने दखल घेतली असली तरी हे काम आमदार पाटील यांनी केले आहे. त्याचे श्रेय केडीएमसीने घेण्याचा प्रयत्न केला आहे.
मनसे आमदार नागरीकांची अशी बरीच कामे करीत असतात. त्याची देखील केडीएमसीने दखल घ्यावी असा सल्ला जिल्हा संघटक पाटील यांनी दिला आाहे. मनपाला शहर सौंदर्यीकरणाचा नुकताच पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार दहा कोटी रुपये रक्कमेचा आहे. हा पुरस्कार केडीएमसीने स्विकारला. त्याबद्दल मनपाचे आणि अधिका-यांचे अभिनंदन पाटील यांनी केले. या पुरस्कारासाठी जे प्रेझेंटेशन राज्य सरकारला सादर करण्यात आले होते ते नागरिकांनाही दाखविण्यात यावे अशी विनंती पाटील यांनी केली आहे. दरम्यान पाटील यांनी केडीएमसीचे उपरोधिक मानलेले आभार, केलेले अभिनंदन आणि प्रेझेंटेशन सादर करण्याची केलेली विनंती कल्याण डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरली आहे.