कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावर खड्डे पडले आहे. प्रशासनाकडून खड्डे भरण्यात येत नाही. मनसेच्या वतीने आज डोंबिवलीतील लोकमान्य टिळकाच्या पुतळयासमोरील रस्त्यावर खड्डय़ात बसून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत आणि महिला आघाडीच्या मंदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. तरी देखील प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्डे भरले जात नाही. दरवर्षी गणेशाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून होते. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरले जावेत यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने हे आंदोलन केले गेले. शहराध्यक्ष घरत यांनी सांगितले की, रस्ते विकासाठी 360 कोटी मंजूर झाले असे फलक शहरात लावले जातात. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाही. महापालिका दरवर्षी खड्डे भरण्यासाठी कोटय़ावधी रुपयांचा निधी मंजूर करते. गेल्यावर्षी 17 कोटी रुपये महापालिकेने खर्च केला होता. यंदाही अशा प्रकारचे खर्च दाखविला जाईल. रस्त्यावरील खड्डे मात्र तसेच असतील अशी टिका केली.