कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता निरिक्षकांची वेतन वाढ रोखल्याने मनसे कामगार सेना आक्रमक झाली आहे. स्वच्छता निरिक्षकांची वेतन वाढ रोखणाऱ््या उपायुक्त अतुल पाटील यांच्या विरोधात आयुक्तांनी कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे आणि मुन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने महापालिका प्रशासनास देण्यात आला आहे.
म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांनी सांगितले की, स्वच्छता निरिक्षक हे चांगले काम करीत असताना त्यांची वेतन वाढ रोखून त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे. उपायुक्त अतुल पाटील हे बेजबाबदारपणे वागत आहेत. त्याची ही कारवाई हेतूपुरस्सर करण्यात आली आहे. या प्रकरणी आम्ही संघटनेच्या वतीने आयुक्तांशी चर्चा करुन हा प्रश्न सोडवू. आयुक्तांनी आमच्या मागणीची दखल घेतली गेली नाही तर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी सांगितले की, स्वच्छता निरिक्षक काम करीत नसल्याने त्यांची वेतनवाढ थांबविली आहे असे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले. मात्र उपायुक्त पाटील हे खोटे बोलत आहेत. स्वच्छता निरिक्षक सकाळपासून दुपारपर्यंत काम करतात. दुपारी चारनंतर जो कचरा पडतो. त्याला स्वच्छता निरिक्षक कसा काय जबाबदार असू शकतो. प्रशासनाची हिटलर शाही खपवून घेतली जाणार नाही. या संदर्भात उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महापालिकेत २ हजार कामगार आहेत. त्यापैकी ५० स्वच्छता निरिक्षक आहेत. १० स्वच्छता अधिकारी आहेत. शहराची स्वच्छता राखणे हे कामगाराचे कर्तव्य आहे. त्यात कसूर केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. कामगारांनी चांगले काम केल्यास आम्हाला कारवाई करण्याची वेळच येणार नाही.