लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून (२४ फेब्रुवारी) कल्याण-डोंबिवली, भिवंडीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी त्यांनी भिवंडी लोकसभेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. पक्ष बांधणीसह लोकसभा निवडणूक लढवायची का? निवडणूक स्वबळावर की युतीमध्ये लढवायची? याबाबत चर्चा केली. यावर निवडणूक लढविण्याकडे बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल दिसून आला.
राज ठाकरे आज डोंबिवलीत-कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याचे संकेत आहेत. सर्वच पक्ष युती आणि आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत असताना मनसेनेही लोकसभा मतदारसंघांमध्ये चाचपणी सुरू केली आहे.
वेगळाच घडला किस्सा-
राज ठाकरेंच्या या दौऱ्यावेळी एक वेगळाच किस्सा घडल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते दुर्गाडी येथे थांबले होते. याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाहनांचा ताफा रस्त्यावरून जात असतानाच मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाटले राज ठाकरेच आले आहेत. त्यांनी लागलीच त्यांच्याकडील फटाके फोडण्यास सुरुवात केली. मात्र, ते राज ठाकरे नसून ते कपिल पाटील असल्याचे समजताच तेथे एकच हशा पिकला आणि फटाके आणण्यासाठी पुन्हा धावपळ उडाली.