कल्याण : शहाड-आंबिवली दरम्यान वडवली रेल्वे उड्डाणपुलाचे सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणारे लोकार्पण अचानक पुढे ढकलले गेले. मात्र, पालकमंत्र्यांचा कार्यक्रम स्थगित होताच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण करून तो वाहतुकीसाठी खुला केला. पुलावर वाहतूक सुरू होताच मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. या कार्यक्रमास आ. पाटील यांना निमंत्रित केले होते. ते वेळेवर पोहोचले असता कार्यक्रम स्थगित झाल्याचे त्यांना समजले.
लोकांना पुलासाठी ताटकळत कशाला ठेवायचे, असा विचार करून मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाटील यांनी पूल वाहतुकीसाठी खुला केला. पाटील म्हणाले, वडवली रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यास महापालिकेस ११ वर्षे लागली. प्रभू रामचंद्र लंकेला गेले तेव्हा रामसेतूसुद्धा लवकर उभा राहिला होता. हा पूल तयार व्हावा याकरिता मनसेचे माजी आ. प्रकाश भोईर यांच्यासह सदस्यांनी पाठपुरावा केला होता. तसेच आंदोलनेही केली होती. पूल तयार झाल्याने रेल्वे फाटक बंद होणार असून रेल्वेच्या फेऱ्या वाढणार आहेत. फाटकामुळे रेल्वे गाड्यांना होणारा विलंब टळणार आहे. पुलाचे लोकार्पण न लांबवता तो खुला केला आहे. पुलाच्या पायाभरणीपासून त्याच्या पूर्णत्वापर्यंत इव्हेंट करण्याची सवय सत्ताधाऱ्यांना लागली आहे, अशी टीका त्यांनी केली.
कल्याण-मुरबाड रोडवरील वालधुनी नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचेही लोकार्पण सोमवारी होणार होते. मात्र, वडवली पुलाचे मनसेने परस्पर लोकार्पण केल्याची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ वालधुनी पुलावर बॅरेकेड लावले व पोलिसाची गाडी आडवी उभी केली. त्यामुळे मनसे आमदारांना वालधुनी पूल वाहतुकीसाठी खुला करता आला नाही. पाटील हे या पुलावरून केवळ चालत गेले.