लोकमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली
दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो डोंबिवलीचा फडके रोड. मात्र सुमारे दीड वर्षांपासून हा रोड कोरोनाच्या काजळीने झाकोळून गेला आहे. ही मरगळ दूर करण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला असून दिपावलीचे औचित्य साधून डोंबिवली शहर मनसेने 'प्रकाश उत्सव' पर्वाचे आयोजन केले आहे. त्यामुळे हा रोड आता लख्ख प्रकाशात उजळून निघाला आहे.
गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे आपल्याला सणही व्यवस्थित साजरे करता येत नव्हते. फडके रोड आणि आप्पा दातार चौक याठिकाणी दिवाळी काळात तरूणाईची लाट येते. डोंबिवलीसाठी या फडके रोडचे सांस्कृतिकदृष्ट्या वेगळे महत्व असून यंदा कोणत्याही संस्थेतर्फे याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. या पार्श्वभूमीवर आम्ही पुढाकार घेऊन मनसेतर्फे हा उपक्रम राबविल्याची प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी दिली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
कोरोनामुळे डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख आणि तरूणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या या फडके रोडची 'रया' लयास गेली होती. मात्र मनसेच्या या दिपोत्सवाने कोरोनामूळे आलेली ही काजळी आणि पूर्वीचा डौल प्राप्त होण्याचा श्रीगणेशा झालेला पाहायला मिळाला. ही नयनरम्य रोषणाई डोंबिवलीकर आपल्या कॅमेरात टिपून घेताना दिसत आहेत.