कल्याण: कल्याण पश्चिमेतील गांधारी येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे. या उपकेंद्रातून विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याने त्यांना मुंबईतील कलीना विद्यानगरीत धाव घ्यावी लागते. मग उपकेंद्र सुरु करुन काय उपयोग झाला असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी आज उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्यासह पदाधिकारी अंकित कांबळे, प्रितेश पाटील, कल्पेश माने, दिप्तेश नाईक, मिलिंद म्हात्रे, विनोद केणो, सचिन आंबेकर आदींनी आज उपकेंद्रास भेट दिली. या वेळी उपकेंद्र परिसराची पाहणी केली. कल्याण, कजर्त, कसारा परिसरातील मुंबई विद्यापीठाची संलग्न असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्यास लागू नये.
त्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी कल्याण येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु केले गेले. मात्र या उपकेंद्रात अद्याप काही अभ्यास शाखा सुरु झालेल्या नाहीत. त्याचबरोबर परिक्षा फॉर्म आणि पदवीचे प्रमाणपत्र मिळविण्याकरीता विद्यार्थ्यांना आजही कलिना विद्यानगरीत धाव घ्यावी लागते. या संदर्भात काही दिवसापूर्वी मनसेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरु अजय भामरे आणि कुल सचिव सुनिल भिरुड यांची भेट घेऊन हीच समस्या कथित केली होती. त्यानंतर आज पुन्हा उपकेंद्र प्रशासनाकडे याच मागण्या करण्यात आल्या आहेत. मनसेच्या या मागण्यांची दखळ न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा गुरव यांनी दिला आहे.