डोंबिवली: डोंबिवलीत झालेल्या अपघातावरुनमनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच हे असं जीव मुठीत घेऊन जगणं कधी थांबणार आहे? खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यांवरचे अपघात ही सर्वार्थाने महापालिकेची जबाबदारी आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
राजू पाटील यांनी ट्विट करत म्हणाले की, सागर राठोड हा तरुण मुलगा रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे तोल जाऊन पडला आणि गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्या अवस्थेकडे पाहू शकत नाही म्हणून इथे फोटो टाकणं टाळलंय. कल्याण-डोंबिवलीकरांच हे असं जीव मुठीत घेऊन जगणं कधी थांबणार आहे? खड्ड्यांनी चाळण झालेल्या रस्त्यांवरचे अपघात ही सर्वार्थाने महापालिकेची जबाबदारी आहे. पावसाळ्यात पाणी जात नाही म्हणून बोंब आणि इतर दिवसात प्यायला पाणी येत नाही म्हणून ओरड, असं र म्हणत राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.
नागरिकांचा रोष तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अर्ज आणि पत्रांतून प्रयत्न केला. पण काही म्हणजे काही बदल नाही. तुमच्याकडे उपाय नसेल तर आमच्याकडे पर्याय आहे, असा इशारा देखील राजू पाटील यांनी दिला आहे. ज्या रस्त्यावर नुसतं चालण्यासाठीसुध्दा माणूस प्रयत्नांची शिकस्त करतो. त्याच रस्त्यावर उतरून जरा स्वतः चालून पहा. गुडघाभर पाण्यात उभे रहा. एसी केबिनमध्ये बसून स्मार्टपणाचे दाखले देऊ नका. कंट्रोल रूमच्या बाहेर या नाहीतर आमचा कंट्रोल सुटेल, असा थेट इशारा राजू पाटील यांनी दिला आहे.