कल्याण- मनसेच्याकल्याणडोंबिवलीमधील दोन माजी नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेने मनसेला जोरदार धक्का दिला आहे. मनसेचे माजी नगरसेवक पूजा पाटील आणि प्रकाश माने यांचा शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला.
आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पूजा पाटील आणि प्रकाश माने यांचा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेचे कल्याण तालुका प्रमुख गजानन पाटील, सुभाष पाटील, भास्कर गांगुर्डे, प्रवीण परदेशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील हातात भगवा झेंडा आणि मनगटावर शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या या प्रवेशावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. पक्षप्रमुखच कोत्या मनाचे आहेत, मग त्यांच्या पिल्लांकडून काय अपेक्षा करणार, असा घणाघात राजू पाटील यांनी केला आहे. एकीकडे बोलायचे आमचा पक्ष जोरात आहे आणि दूसरीकडे माणसं पळवायची, यावरुन कळते की, किती कोत्या मनाचे आहेत, असं राजू पाटील म्हणाले.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करताना 'शिवसेनेच्यावतीने कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या विकासकामांना मिळलेली ही पावती असल्याचे सांगितले. कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरात सुरू असलेली विकासकामे पाहता, अशी विकासकामे आपल्या विभागात देखील व्हावी, या इच्छेने अनेक जण शिवसेनेशी जोडले जात असल्याचे सांगितले. हे सर्वजण स्वतःहून आम्हाला पक्षात घ्या असे सांगून आले असल्याने त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करून कुणाला पक्षात आणलेले नाही, असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.
कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना 'कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या अनेक विकासकामे सुरू असून या विकासाचा भाग होण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. याच भावनेतून आपल्या विभागाचा देखील अशाच पद्धतीने सुनियोजितपणे विकास व्हावा या दृष्टिकोनातून आज या दोन्ही माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले. यापूर्वी देखील राजेश कदम, सागर जेधे, अर्जुन पाटील हे मनसेमधून भाजपमध्ये आले आहेत, तर भाजपमधून महेश पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये दाखल झाले होते. येणाऱ्या काळात ही संख्या अधिक वाढत जाईल' असेही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.