कल्याण : पलावा येथील २५ हजार प्लॅट धारकांना मालमत्ता कर न भरल्याने केडीएमसी प्रशासनाने जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. ही नोटिस त्वरीत रद्द करुन आयटीपी योजने अंतर्गत नागरीकांना दिलासा मिळावा यासाठी मनसेआमदार राजू पाटील यांनी आज केडीएमसी आयुक्त डा’. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. लवकर हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन आयुक्तांनी मनसेआमदारांना दिले आहे.
पलावा येथील कासा रिओ आणि कासा बेला या परिसरातील २५ हजार फ्लॅट धारकांना केडीएमसीने मालमत्ता कर न भरल्याने नोटिस पाठविली आहे. ही नोटीस त्वरीत रद्द करण्यात यावी. या फ्लॅट धारकांना आयटीपी प्रकल्पांतर्गत सवलत मिळावी यासाठी अनेक वर्षापासून मागणी आहे. ही मागणी केडीएमसीने मान्य करावी. नागरीकांना दिलासा द्यावा. या संदर्भात आयुक्तांनी सरात्मक प्रतिसाद दिला आहे.
डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरीतील रस्ते फेरीवाला मुक्त करण्यात यावे. स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतूक कोंडी होते. हा परिसर फेरीवाला आणि वाहतूक कोंडी मुक्त करावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आयुक्तांनी यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिल्याने पंधरा दिवसाकरीता हे आंदोलन स्थगित केले आहे. मात्र पंधरा दिवसांनी काही एक उपाय योजना झाली नाही तर मनसे आंदोलनावर ठाम असेल असा इशारा आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.
कोपर रेल्वे ट्रॅक परिसराला लागूनच खाडीतून तसेच मोठा गाव- माणकोली खाडी पूलाजवळही रेती उपसा केला जात आहे. या रेती उपसामुळे रेल्वे ट्रॅक व पूलाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे आमदार पाटील यांनी सांगितले.