डोंबिवली: डोंबिवली जिमखान्याला स्टेडियम साठी पंचवीस कोटींच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. जिमखान्याचा आजीवन सदस्य या नात्याने मनसे आमदार राजू।पाटील यांनी शिंदे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. परंतु हे करत असतानाच आमदार पाटील यांनी तातडीने एक मागणी करत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आरक्षीत भूखंड तसेच गुरचरण जागा अजूनही शिल्लक आहेत. अश्या भूखंडांवर / गुरचरणींवर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रशस्त स्टेडियम साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी जाहीर विनंती व मागणी पाटील यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
कोणताही दुजाभाव न करता आपण माझी ही मागणी मान्य कराल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले।की, डोंबिवली जिमखान्याने कोविड काळात कोणतेही भाडे न आकारता कोविड सेंटरसाठी मोफत जागा दिली होती. परंतु कोविड संपल्यानंतर अनेक विनवण्या करूनही मनपाने एकप्रकारे कृतघ्नता दाखवत जागा रिकामी करून दिली नव्हती, त्याचा प्रचंड मनस्ताप सर्वच जिमखाना सदस्यांना व खेळाडूंना झाला होता. परंतु त्यातूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा करून एकप्रकारे या जखमेवर फुंकर घालण्याचे काम केले आहे त्याबद्दलही आभार मानले.
त्या निमित्ताने पाटील यांनी शिंदे यांना विनंती केली की, ग्रामीण भागात कित्येक मुलं-मुली क्रिकेट,कब्बड्डी,कुस्ती,शुटींग, फुटबॉल अश्या विविध खेळ प्रकारात आपले नैपुण्य दाखवत आहेत. एकीकडे सरकारने आमच्या हक्काच्या गुरचरण जमिनी मेट्रो कारशेड,डंपिंग, ग्राऊंड, ग्रोथ सेंटर, म्हाडा व इतर बिल्डरांच्या घश्यात घातल्याच आहेत, मात्र उरलेल्या जागांवर विचार करून त्या जमिनी वाचवा असे म्हंटले.