डोंबिवली: कल्याणडोंबिवली मधील रस्त्यांची जबाबदारी आमची असल्याचे नेते मंडळी नागरिकांना सांगत आहे. नवरात्रीच्या कालखंडात फक्त रस्त्यांची घेतलेली जबाबदारी आता नेते देखील विसरून गेले आहेत. गुरुवारी काही वेळ झालेल्या पावसात नांदीवली परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांची दुर्दशा झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नांदीवली परिसरात साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या परिसरात नाले नसल्याने नाल्यांतील पाणी थेट रस्त्यावर येत आहे. सतत पाणी रस्त्यावर येत असल्याने आमदार राजू पाटील यांनी या परिसरासाठी तीन पंप पाणी निचरा करण्यासाठी आपल्या आमदार फंडातून दिले होते. मात्र त्यामधील दोन पंप मनपा प्रशासनाने ताब्यात घेऊन एकच या परिसरात ठेवून धन्यता मानली आहे. या परिसरात नागरिकांचे होत असलेले दररोजचे हाल लक्षात घेता मनसे आमदार राजू पाटील यांनी या परिसरात जाऊन पुन्हा एकदा नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.
वारंवार समस्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील लक्ष देत नसल्याने नागरिक संतापले होते. यावेळी नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा दिला. मात्र आता नागरिक रस्त्यावर उतरण्याआधी मी रस्त्यावर उतरून आंदोलनाच नेतृत्व करेल अस आमदार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मनसे अध्यक्ष विनोद पाटील, सचिव अरुण जांभळे, विभाग अध्यक्ष रक्षित गायकर, संदीप म्हात्रे,ओम लोके यांसह परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची जबाबदारी घेणारे आता शहरांची जबाबदारी घेऊन समस्यांवर मात करणार का? हे पाहणं देखील महत्वाच ठरणार आहे.