कल्याण - कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे मनसेचे आमदार राजू पाटील (MNS Raju Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदारांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा होऊन ते जनसेवेत पुन्हा रुजू व्हावेत या भावनेने डोंबिवलीचे मनसेचे शहर संघटक योगेश पाटील यांनी थेट पंढरपूर गाठत विठुरायाच्या चरणी अभिषेक करत दर्शन घेतले आहे. यावेळी पंढरपूर मधील मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. पाटील यांचे आपल्या नेत्याप्रति असलेल्या निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान राजू पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युवकांची संख्या मोठी आहे. कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण राज्यातील मनसेमधील युवावर्ग राजू पाटील यांचे चाहते आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही युवकांनी त्यांना भरघोस पाठींबा दिला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली. तसंच संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
"गेले वर्षभर कोरोनासोबत लपंडाव खेळत होतो. पण तुर्तास कोरोनाच्या तावडीत सापडलोच. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास कोरोना चाचणी करावी. कोरोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन," अशा आशयाचं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही चिंताजनक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत.