घटस्थापनेच्या मुहूर्तावर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं खुली करण्यात आली आहेत. डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर सकाळी भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळपासूनच आपल्या लाडक्या दैवताच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मनसेच्या वतीनेही या ठिकाणी आरती करण्यात आली. यावेळी मंदिर खुले करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल राजू पाटील यांना विचारले असता उशिरा का होईना, सरकारला जाग आली असं विधान केलं. एकप्रकारे हा निर्णय घ्यायला सरकारने खूपच उशीर केला असं सांगत त्यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
गुरुवारी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (MNS Raju Patil) यांनीही आज मनसैनिकांसोबत गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर दुर्गा पूजा करत आरती करण्यात आली यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की कोणत्याही पक्षाची नाही तर जनभावना लक्षात घेता मंदिर उघडण्याची मागणी होत होती. उशिरा का होईना पण सरकारला जाग आली, मंदिर त्यांनी उघडली त्याबद्दल सरकारचे आभार मानतो असेही ते म्हणाले. राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान याची भरपाई सरकारने दयावी. त्वरित पंचनामे करावे, पंचनाम्याच्या आधी ही शेतकऱ्यांना काही रक्कम दयावी अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली. याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष मनोज घरत, महिला शहर अध्यक्ष मंदा पाटील, कोमल पाटील, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे आदी उपस्थित होते.