केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) हे रविवारपासून तीन दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ठाकूर यांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांसह पालिका अधिकाऱ्यांची भेट घेत विकास कामांचा आढावा घेतला. तसेच त्यांनी स्मार्ट सिटी येथील कंट्रोल रूमला भेट दिली. याच दरम्यान त्यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त करत आयुक्तांना खडे बोल सुनावले. यावरून आता मनसेने खोचक ट्विट करत निशाणा साधला आहे. KDMC फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
मनसेचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील (MNS Raju Patil) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "हे शहर स्मार्ट सिटीमध्ये आहे का? हे ऐकून मी आश्चर्यचकीतच झालो, रस्ते पण खराब आहेत… केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आयुक्तांना खडे बोल... अनुराग ठाकूरजी, आमची #KDMC फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो….बरं झाले आपणच घरचा आहेर दिला" असं राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कल्याणवर भाजपचा दावा नाही - ठाकूर
कल्याण लोकसभा मतदारसंघात आमच्या मित्रपक्षाचे खासदार डॉ. शिंदे कार्यरत आहेत. पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे कार्य आम्ही करत आहोत, त्याचा एक भाग म्हणून हा दौरा आहे. या मतदारसंघावर दावा करण्याचा भाजपचा हेतू नाही, असे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले. शिंदे यांच्या निवासस्थानी ठाकूर यांनी मोदकाचा आस्वाद घेतला आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत प्रसाद मिळाल्याचे सांगितले. मोदक गोड होता, त्यात माध्यमांना वाटते म्हणून मसाला लावून त्याची गोडी का घालवायची, असे ते म्हणाले.
भाजपचा आढावा सुरू असला, तरी माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला कोणताही धोका नाही, असे वक्तव्य खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. हा दौरा घोषित झाल्यापासून डॉ. शिंदे यांच्या उमेदवारीला धोका, कल्याण मतदारसंघावर भाजपचा दावा, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या आता थांबवा, असेही ते म्हणाले. हा नियोजित दौरा होता. तो त्यांनी केला. सकारात्मक दृष्टीने त्या दौऱ्याकडे आम्ही पाहात असून, माध्यमांनी मसाला लावून बातम्या देणे थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आगामी काळात भाजप - शिवसेना यांच्यात युती होऊन निवडणुका लढवल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा मलाच उमेदवारी मिळेल आणि युतीच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यरत राहू, असेही डॉ. शिंदे म्हणाले.